अकोला (आकाश बोरसे) : आकोट–हिवरखेड–जळगाव जामोद राज्यमार्गावर हिवरखेड ते खंडाळा फाटा दरम्यान रखडलेल्या पुलांच्या कामामुळे वाहतूक सतत ठप्प होत असून अनेक अपघात घडत आहेत. नुकत्याच एका अपघातात एका आदिवासी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून याची नोंद हिवरखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या घटनेवर वस्तुनिष्ठ आणि तथ्याधारित बातमी स्थानिक पत्रकाराने प्रसिद्ध केली. मात्र, संबंधित ठेकेदाराने त्या बातमीमुळे संतप्त होऊन पत्रकारास फोनवरून तसेच प्रत्यक्ष पुलाजवळ बोलावून अश्लील शिवीगाळ केली आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या. तसेच, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत हिवरखेड येथील पत्रकारांनी पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, अपघातामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याने संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन फक्त हिवरखेड पोलीस ठाण्यात न राहता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही पाठविण्यात येणार असल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केले. या प्रकरणात प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देताना संदीप इंगळे, किरण सेदानी, महेंद्र कराळे, मनीष भुडके, गणेश सुरजोशी, सतीश इंगळे, रितेश टिलावत, संतोष राऊत, राजेश पांडव, सुरज चौबे, जितेश कारिया, अर्जुन खिरोडकर, राहुल गिहे, बाळासाहेब नेरकर, गजानन राठोड, जितेंद्र लाखोटिया, अनिल कवळकार, सुनील बजाज, शाहरुख लाला, जमीर शेख, प्रदीप पाटील, जावेद खान, शहजाद खान, फारूक सौदागर, उमर बेग मिर्झा यांसह हिवरखेड येथील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.










