संग्रामपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) : मिशन परिवर्तन उपक्रमांतर्गत जिल्हा पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सोनाळा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवक–युवतींसाठी लेखी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ही परीक्षा ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील टुनकी येथील आदिवासी विद्यालयात घेण्यात आली.
ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांना पोलीस सेवेत संधी उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. नुकतेच बदली होऊन आलेले, जनसंपर्कात पारंगत व उत्साही ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली.
या सराव परीक्षेला तालुक्यातून एकूण २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ५० युवती आणि १६० युवकांचा समावेश होता. परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी सोनाळा पोलिस स्टेशनच्या पथकाने काटेकोरपणे केली.
परीक्षेत उत्तम गुणांसह यश मिळविणाऱ्या उमेदवारांसाठी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक निश्चित करण्यात आले असून, विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती सोनाळा पोलिस स्टेशनचे विनोद शिंबरे यांनी दिली.
ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि संधी मिळण्यासाठी असा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.












