अंकुश देशमुख विरुद्ध आदित्य ढवळे — कोण मारणार विजयी बाजी?
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शेगावच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. यावेळी विशेष लक्ष वेधून घेत आहे ते दोन्ही प्रमुख पक्ष — भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस — यांनी दिलेली युवा शक्तीला संधी. प्रभाग 10 मध्ये यंदाची लढत अनुभवी नेत्यांपेक्षा तरुण नेतृत्वाची ठरणार आहे, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
भाजपाकडून अंकुश विजयबाप्पू देशमुख तर काँग्रेसकडून आदित्य शामभाऊ ढवळे हे दोन युवा, उत्साही आणि जनसंपर्कात सक्रिय उमेदवार मैदानात उतरले आहेत. दोघांचेही स्थानिक पातळीवरील काम, सोशल कनेक्ट आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता पाहता ही लढत अधिकच रोमांचक बनली आहे.
प्रभागातील प्रलंबित विकासकामे, रस्ते-दुरुस्ती, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत दोन्हीही उमेदवार घरोघरी भेटी देत आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही तरुण उमेदवारांमुळे प्रभागातील युवक वर्गही उत्साहाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना दिसत आहे.
जोरदार जनसंपर्क मोहीम, प्रभावी सोशल मीडिया प्रचार आणि प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत देशमुख विरुद्ध ढवळे अशी सरळ टक्कर निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंचे प्रचारकर्तेही आपापल्या उमेदवारांसाठी वातावरण निर्मितीमध्ये गुंतले असून प्रभाग 10 ची निवडणूक रंगात आली आहे.
आता सगळ्यांचे लक्ष एकाच प्रश्नावर… या युवा लढतीत कोण मारणार बाजी?
प्रभाग 10 चा कौल कोणाच्या बाजूने पडणार?
याचे उत्तर मिळणार मात्र मतदानाच्या पेटी उघडल्यावरच!










