शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : जयपूर, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद, पुरी आदी ठिकाणी जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना शेगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याचा गंभीर प्रश्न शेगाव प्रवासी संघटनेने थेट DRM भुसावळ मा. पुनीत अग्रवाल यांच्या समोर मांडला. यानिमित्ताने काल भुसावळ येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान संघटनेतर्फे अॅड. पुरुषोत्तम डांगरा, अॅड. मनोज जैन, वरुण नागपाल व अजय ग्वालाणी उपस्थित होते.
१५ हून अधिक गाड्यांना शेगाव थांबा नाही — अन्यायकारक स्थिती
संघटनेने निदर्शनास आणून दिले की, सध्या शेगावहून १५ पेक्षा अधिक एक्सप्रेस गाड्या जात असल्या तरी त्यांना थांबा देण्यात आलेला नाही. यातील अनेक गाड्यांना शेगावपेक्षा कमी प्रवासीसंख्या व कमी महसूल असलेल्या स्थानकांवर थांबे दिलेले असून, शेगावला डावलले जात असल्याने ही बाब अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले.
शेगाव येथे तातडीने थांबा द्यावा — प्रमुख गाड्यांची यादी
संघटनेने खालील गाड्यांना तातडीने शेगाव स्थानकावर थांबा देण्याची ठोस मागणी केली —
- 12719/12720 हैदराबाद – जयपूर एक्सप्रेस
- 22109/22110 बल्लारशाह – मुंबई एक्सप्रेस
- 17605/17606 काचिगुडा – भगत की कोठी (जोधपूर) एक्सप्रेस
- 19021/19022 उधना – ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस
- 20625/20626 चेन्नई – भगत की कोठी एक्सप्रेस
- 12843/12844 पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस
याशिवाय आणखी १० हून अधिक गाड्यांना शेगाव येथे थांबा नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
प्लॅटफॉर्म सुविधा पूर्ण; तांत्रिक अडचण नाही
पूर्वी लालगड नावाने धावणारी व सध्या काचिगुडा–बीकानेर (07053/54) म्हणून सुरू असलेल्या गाडीचा मार्ग बदलल्यानंतर शेगावचा थांबा अचानक काढण्यात आला असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
संघटनेने स्पष्ट केले की, शेगाव स्थानकावर तिसऱ्या प्लॅटफॉर्म लाईनचे काम पूर्ण झाले असून, आता गाड्यांना थांबे देण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण उरलेली नाही.
तीर्थक्षेत्र शेगावचे महत्त्व अधोरेखित
निवेदनात नमूद केल्यानुसार —
- शेगाव हे श्री गजानन महाराज समाधी मंदिरामुळे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र
- दरवर्षी लाखो भाविकांची देश-विदेशातून ये-जा
- NSG-3 दर्जाचे रेल्वे स्थानक
- वार्षिक सुमारे ₹40 कोटींचा महसूल
- दररोज २०,०००+ प्रवासी वर्दळ
- १ जानेवारी रोजी २.५ लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती
बुलढाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसाठी शेगाव हे प्रमुख रेल्वे केंद्र आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर थांबे आवश्यक
येणाऱ्या काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा अपेक्षित आहे. त्यामुळे शेगाव येथे प्रवाशांची गर्दी वाढणार असून, सर्व प्रमुख प्रवासी गाड्यांना शेगाव येथे थांबा देणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेने ठामपणे मांडले.
या वेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने DCM भुसावळ मा. भानुदास तपस्वी यांचीही भेट घेऊन याच आशयाचे निवेदन सादर केले.
DRM कडून सकारात्मक प्रतिसाद
या सर्व मुद्द्यांवर DRM मा. पुनीत अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शेगाव स्थानकावरील गाड्यांच्या थांब्यांसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
शेगाव प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाने या मागणीवर लवकरात लवकर ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.











