शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : सामाजिक बांधिलकी जपत सकल मराठा परिवार यांच्या वतीने दिनांक १६ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भट्टड हॉल, भट्टड जीन, श्रीरामनगर जवळ, शेगाव (जि. बुलडाणा) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे दिले जाणारे प्रत्येक थेंब रक्त गरजू रुग्णांच्या जीवनासाठी उपयोगी ठरणार आहे. “रक्तदान हे श्रेष्ठ दान” या भावनेतून आयोजित या उपक्रमात कोणत्याही जात, धर्म, पंथाचा भेद न ठेवता सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.
एका रक्तदात्यामुळे तीन जीव वाचू शकतात, या जनजागृतीसह सकल मराठा परिवाराने या उपक्रमाला सामाजिक स्वरूप दिले आहे. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि सोयीसुविधांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
“रक्तदान करून समाजसेवेचा एक अमूल्य भाग बना!” — अशा मानवतावादी संदेशाने शेगाव परिसरात एकतेचा आणि सेवाभावनेचा सशक्त संदेश दिला जात आहे.










