युवा क्रांती वृतसेवा : पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील नागरिक व पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) येथून दिल्लीसाठी आणि दिल्लीहून संभाजीनगरकडे नव्याने दोन विमानसेवा सुरू होत असून, त्या २६ ऑक्टोबर २०२५ पासून जनतेच्या सेवेत दाखल होत आहेत.
ही सेवा सुरू करण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली होती. ही मागणी मंजूर होऊन आता प्रत्यक्षात अंमलात येत आहे.
सध्या इंडिगो (6E-2324) आणि एअर इंडिया (AI-1443) या दोन सेवा सुरू आहेत. याशिवाय पूर्वी संध्याकाळी ६.५० वाजता सुरू असलेली एअर इंडियाची अतिरिक्त सेवा बंद करण्यात आली होती. ती सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून, आता दिल्ली-सम्भाजीनगर दरम्यान दररोज एकूण चार विमान फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
- संभाजीनगरहून दिल्लीकडे:
सकाळी ८:४० वाजता आणि दुपारी ४:३० वाजता - दिल्लीहून संभाजीनगरकडे:
सकाळी ६:०० वाजता आणि दुपारी ३:०० वाजता
ही सेवा बुलढाणा, जालना, बीड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना दिल्लीकडे प्रवासासाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच या भागातील पर्यटन स्थळांना देखील चालना मिळणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांचे शेगाव येथील समाधीस्थळ, लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर, सिदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा-वेरुळ लेणी ही ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनस्थळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करतात.या नवीन विमानसेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे.











