नाशिक(युवा क्रांती वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर लहान मुलांसह काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटोळे परिसरात घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात उलटली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली.
या अपघातात निलेश बुकाणे, त्यांची पत्नी छाया बुकाणे आणि त्यांची सख्खी बहीण वैशाली सचिन घुसळे (सर्व रा. चिंचपाडा, कल्याण पूर्व) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात कुटुंबातील इतर सदस्य, ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे, गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात महत्त्वाची मदत केली. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.











