संग्रामपूर (आकाश बोरसे): संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन टिप्पर वाहनांवर महसूल विभागाने आज धडाकेबाज कारवाई केली. सोमवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 ते 8 या वेळेत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संयुक्त तपासणी करून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, खिरोडा–पूर्णा नदी परिसरातून परवानगीशिवाय रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून दोन टिप्पर वाहनांची तपासणी केली. विचारपूस केली असता चालक व मालक यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
तपासणीदरम्यान 2 ब्रास रेती असलेले टिप्पर क्रमांक MH 28 BB 4073 (मालक: विवेक दाणे, रा. खिरोडा) आणि MH 28 BB 9673 (मालक: गौरव दाणे, रा. खिरोडा) ही दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईत तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास शिंदे, मंडळ अधिकारी के. एस. तांबारे, एस. एस. कुसळकर, ग्राम महसूल अधिकारी के. के. जगताप, जाधव, विनोद भिसे आणि दामोदर यांनी सहभाग घेतला.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)











