संग्रामपूर (आकाश बोरसे): संग्रामपूर तालुक्यातील खळद येथे एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील विठ्ठल महादेव आमझरे (वय २४) यांचा वान नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असून याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल आमझरे हे अनंता भाऊराव बिहाडे यांच्या शेतात काम करून घरी परतत असताना वान नदीकाठाने जात असताना त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले. घरच्यांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी पातुर्डा गावाजवळील पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
मृतकाचे चुलते देवीदास तुकाराम आमझरे (वय ५५) यांनी तामगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मर्ग क्र. ४३/२०२५ नोंदवून बीएनएसएस कलम १९४ अन्वये तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास बिट जमदार अशोक वावगे करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे खळद गावात शोककळा पसरली असून गावकरी व नातेवाईक व्यथित झाले आहेत. विठ्ठल यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार असून हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (युवा क्रांती वृतसेवा)










