संग्रामपूर (आकाश बोरसे): दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संग्रामपूर तालुक्यात शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संग्रामपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था यांच्या वतीने संस्थेच्या आवारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात तालुक्यातील पाच आदर्श शेतकऱ्यांचा शाल व टोपी देऊन गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विश्वासराव वरणकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री भाऊराव पाटील, संचालक श्री राजूभाऊ देशमुख, श्री निरंजन इंगळे, श्री हरिभाऊ राजनकर, श्री संजय बोरसे, सचिव श्री पंकज मारोडे यांच्यासह व्यवस्थापक श्री एम. एस. धाडे, संस्थेचे सर्व कर्मचारी व हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगत, शेती व ग्रामीण विकासात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी नमूद केले. (युवा क्रांती वृत्तसेवा)













