शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : 14 ऑगस्ट: संत निरंकारी मिशन हरित जाणीवेला आणि पर्यावरणाप्रती अतूट समर्पणाला निरंतर वृद्धिंगत करत रविवारी, 17 ऑगस्ट 2025 ला ‘वननेस वन’ उपक्रमाच्या पाचव्या चरणांतर्गत दिवाणी न्यायालय क-स्तर शेगांव परिसरा सह देशभरातील अनेक नवीन ठिकाणे या जनसामुदायिक अभियानाशी जोडेल. सकाळी 6 ते 9 दरम्यान हजारो सेवादार आणि श्रद्धाळू भाविक एकत्रितपणे वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गाप्रति आपली निष्ठा व त्याच्या संरक्षणाचा संकल्प याचा पुनरुच्चार करतील.

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली 2021 मध्ये सुरू झालेली ‘वननेस वन’ परियोजना ही केवळ एक वृक्षारोपणाचा उपक्रम यापुरते मर्यादित नसून ते निसर्गाशी समतोल व सह-अस्तित्वाची भावना जागृत करणारे एक महत्त्वपूर्ण अभियान आहे. आपण निसर्गापासून वेगळे नसून त्याचाच एक अविभाज्य अंग आहोत ही भावना या अभियानातून शिकवली जाते. तद्वत या निसर्गाचे संरक्षण म्हणजे प्रत्यक्षात स्वतःच्या जीवनाचे आणि भविष्याचे रक्षण करणे होय.वृक्षांच्या या रोपट्यांनी इतकी घनता प्राप्त केली आहे की ती आता एका ‘लघु वनाचे’ स्वरूप धारण करु लागली आहेत. हे परिवर्तन केवळ बाह्यरूपी हिरवळी पुरते मर्यादित न राहता, आता या लघु वन प्रदेशात अनेक प्रवासी व दुर्मिळ प्रजातींचे पक्षीही आश्रय घेऊ लागले आहेत, ज्या प्रजाती पूर्वी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होत्या.
निःसंशयपणे, जैवविविधता व पर्यावरणीय समतोल राखण्यात या सर्व सजीवांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘वननेस वन’ अभियान हे केवळ पर्यावरणाच्या रक्षणाचे माध्यम नाही, तर मानव आणि निसर्ग यामध्ये पुन्हा एकदा आत्मिक नातेसंबंध स्थापित करत आहे. एक असे नाते जे खऱ्या अर्थाने ‘एकत्वाचे’ प्रतीक आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘वननेस वन’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत नगर परिषद डम्पिंग ग्राउंड, शेगांव सह देशभरातील 600 हून अधिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही केवळ हिरवळ वाढवण्याची मोहिम नसून, लघु वनांच्या रूपात एक शाश्वत आणि संतुलित पर्यावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक यथायोग्य प्रयत्न आहे. मिशनचे स्वयंसेवक या वृक्षरोपांची देखभाल अत्यंत श्रद्धा व समर्पणाने करत आहेत, कारण त्यांच्यासाठी प्रत्येक रोपटे हे केवळ एक वृक्ष नसून भावी पिढ्यांच्या श्वासांचा आधार आहे.

पूज्य बाबा हरदेव सिंहजी यांचा सुवर्णरूपी संदेश — “प्रदूषण अंतर्मनातील असो अथवा बाह्यजगातील, दोन्ही हानिकारक आहेत” — या संपूर्ण अभियानाचा प्रेरणास्त्रोत बनला आहे. याच जाणीवेने प्रेरित होऊन, संत निरंकारी मिशनचे सेवादार बाह्य पर्यावराणासोबत अंतःकरणाची शुद्धता राखण्याच्या दिशेने प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करत आहेत. कारण जेव्हा मन निर्मळ असते, तेव्हाच विचार, वाणी आणि कर्मही निर्मळ असतात.
संत निरंकारी मंडळाचे सचिव, श्री. जोगिंदर सुखीजाजी यांनी सांगितले, की ‘वननेस वन’ उपक्रमांतर्गत स्थानिक पर्यावरणानुसार वृक्षांची निवड करून त्यांची देखभाल जैविक खत, स्वच्छ पाणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली जाते, जेणेकरून दीर्घकाळ हरितता सुनिश्चित होईल. ते पुढे म्हणाले, की पर्यावरण संकटाच्या या काळात मिशनचा हा पुढाकार एक समयसूचक, जागरूक आणि समाजासाठी प्रेरणादायक असा उपक्रम आहे.
