बीड (युवा क्रांती वृत्तसेवा): बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य, उपलब्ध पुरावे आणि प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेता आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
यापूर्वीही जिल्हा व उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला
या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडने यापूर्वी बीड जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता आणि तपासातील प्राथमिक पुरावे लक्षात घेऊन तो अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन तसेच दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयानेही आरोपीला कोणताही दिलासा न देता जामीन अर्ज फेटाळला होता.
सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही
जिल्हा आणि उच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्यानंतर वाल्मिक कराडने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणातील गंभीर बाबींचा विचार करून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सलग तिसऱ्या न्यायालयातूनही दिलासा न मिळाल्याने त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणात महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.








