कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, पक्षात नवी ऊर्जा!
बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने नवीन जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, बुलढाणा जिल्ह्याचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून संतोष डिवरे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
संतोष डिवरे हे यापूर्वी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्ष संघटन बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केले असून, जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांवर घेतलेली भूमिका आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेले मजबूत जाळे यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपविली आहे.
नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर संतोष डिवरे यांनी पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील नेतृत्वाचे आभार मानले. “पक्षाचा विस्तार आणि सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान हा माझा प्राथमिक उद्देश असेल,” असे ते म्हणाले.
या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध तालुक्यांतून अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.










