शेगांव(युवा क्रांती वृतसेवा) : लहुजी नगर, शेगांव येथील तरुण संशोधक शुभम तायडे यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे. सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित 76 व्या International Astronautical Congress (IAC 2025) मध्ये त्यांनी आपला संशोधन पेपर सादर करत जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केले.
Dfy Graviti Technologies Pvt. Ltd., भारत या प्रतिष्ठित संस्थेशी संलग्न असलेले शुभम यांचा (IAC-25, B1,8,9,x96372) हा पेपर oral presentation म्हणून स्वीकारला गेला होता. त्यांच्या संशोधनात अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रह प्रणाली या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तांत्रिक दृष्टिकोनावर भर देण्यात आला. त्यांच्या या प्रकल्पात उत्कर्ष कर्ण हे सहलेखक म्हणून सहभागी होते.
या जागतिक परिषदेत शेकडो नामांकित अंतराळ संशोधक, तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक सहभागी झाले होते. अंतराळ क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संशोधन दिशा आणि भविष्यातील संकल्पनांवर ही परिषद आधारित होती.

शेगांव येथील एका सामान्य कुटुंबातील शुभम तायडे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर जागतिक मंचावर ठसा उमटवला असून, त्यांच्या या यशामुळे शेगांव आणि संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.
शुभम यांनी सांगितले की, भारतामधील नवोदीत तंत्रज्ञान कंपन्यांचे योगदान आणि तरुण संशोधकांच्या कल्पनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हा त्यांच्या सहभागाचा प्रमुख उद्देश होता. पुढील काळातही अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करून देशासाठी योगदान देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक नागरिक, अभ्यासक आणि तरुणांमध्ये त्यांच्या या यशामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तरुण संशोधकांसाठी शुभम तायडे प्रेरणादायी ठरत आहेत.









