शेगांव (युवा क्रांती वृत्तपत्र): शहरातील श्री यादव बेकरी ते होलापुरा रस्ता गेल्या काही दिवसांपासून खोदकामामुळे अत्यंत खराब अवस्थेत असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी विजय डीगांबर यादव यांनी शेगांव नगर परिषदेकडे लेखी तक्रार देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी रस्त्याचे अर्धवट खोदकाम करून दगड व माती रस्त्यावरच टाकून ठेवण्यात आली आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे खडबडीत झाला असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी वाहनांचे घसरण्याचे प्रकार वाढले असून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
तसेच या रस्त्यावरून पादचाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना चालणेही अवघड झाले आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे रस्त्यावर पडलेले दगड दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रस्त्यावर टाकलेली माती आणि खडीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून रहिवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला रस्ता समतल करून डांबरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी नगर सेवक विजय यादव यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या अपघातांना प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.









