शेगांव (डी ललित) : रेणुका नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹2 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल साहेबराव पारसकर (वय 35, रा. रेणुका नगर) हे 28 नोव्हेंबर रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना 28 ते 29 नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील बेडमध्ये ठेवलेल्या बॅगेमधून सोन्याचे नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, मंगळसूत्र, देवघरातील दागिने, चांदीची भांडी तसेच ₹35,000 इतकी नगदी रक्कम असा एकूण ₹2.85 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून पुढील तपास PSI गजानन गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)













