शेगाव (डि ललित): शेगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार शेगाव येथील राजू दादाराव दांगटे (वय 43) हे इसम गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत त्यांची पत्नी पुष्पा राजू दांगटे (वय 40, व्यवसाय – घरकाम) यांनी शेगाव शहर पोलिसात तोंडी रिपोर्ट दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता राजू दादाराव दांगटे हे “कामानिमित्त पुण्यास जात आहे” असे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर चार-पाच दिवस उलटूनही ते घरी परतले नाहीत. दरम्यान, त्यांचा मोबाईल फोन देखील बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
बेपत्ता इसमाचा नातेवाईकांकडे व परिचितांकडे शोध घेण्यात आला असता कोणतीही माहिती मिळाली नाही. शेगाव व नातेवाईकांकडे शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे शेगाव शहर पोलिसांकडे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :
उंची सुमारे 5.5 फूट, रंग गोरा, बांधा मध्यम. अंगात चौकटीचा काळ्या-पांढऱ्या रंगाचा शर्ट, पायात काळ्या रंगाची जिन्स, तसेच काळ्या रंगाची पट्ट्याची चप्पल होती. उजव्या हातावर “राजू” नाव गोंदलेले आहे.
या इसमाबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्वरित शेगाव शहर पोलिस स्टेशन किंवा नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.(युवा क्रांती शेगांव)












