शेगाव ( डी ललित): लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना शेगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कॉलेजमध्ये ओळख, नंतर विश्वासघात
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सन 2021 मध्ये अकोला येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड रिसर्च येथे जी.एन.एम. (GNM) चे शिक्षण घेत होती. त्याच कालावधीत तिची ओळख त्याच कॉलेजमध्ये बी.एससी. नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या आरोपी आदर्श कैलास गवई याच्याशी झाली.
ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.
लॉजवर नेऊन जबरदस्तीने संबंध
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला शेगाव येथील श्रीवंश लॉज येथे नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आश्वासन दिल्यामुळे तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवला.
यानंतर आरोपी आणि फिर्यादी हे जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या कालावधीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
लग्नास नकार; पोलीसांत गुन्हा दाखल
नोव्हेंबर 2025 नंतर आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे पीडित तरुणीने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी CCINS प्रणालीद्वारे ऑनलाईन FIR प्राप्त झाली असून शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षकांकडे
सदर FIR वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)







