शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शेगांव येथील मोनालिसा गोविंद वर्मा यांना ‘कृती गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावर प्रशंसा होत असून, येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

हा कृती गौरव पुरस्कार समारंभ बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे आयोजित करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन बीएसएफ बहुउद्देशीय संघटन, संत कबीर बहुउद्देशीय संघटन, उपेक्षित नायक न्यूज आणि संकल्प बहुउद्देशीय संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे.
या सोहळ्यात सामाजिक, साहित्य, पत्रकारिता, कृषी व कला अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘कृती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात चित्रपटसृष्टी, सामाजिक क्षेत्र व पत्रकारिता जगतातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार असून, त्यामुळे या सोहळ्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

या राज्यस्तरीय पुरस्कार समारंभाचे मुख्य आयोजक भूषण सरदार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. शेगांव शहरासाठी ही एक अभिमानाची बाब मानली जात असून, मोनालिसा गोविंद वर्मा यांच्या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.











