शेगांव (चेतना खेते): केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी व साहित्याची नोंदणी केली.
आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून शेगांव येथील संत नगरीत हा राष्ट्रीय आरोग्य मेळावा पार पडला. मेळाव्यात आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दिव्यांग बांधवांसाठी 27 फेब्रुवारी रोजी विशेष तपासणी व साहित्य नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत कर्णयंत्र, चालण्याची काठी, कंबरपट्टा, पायाचा पट्टा, व्हीलचेअर, इलेक्ट्रिक व्हीलचेअर यांसारखे साहित्य वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला सुमारे १० हजार रुपयांपर्यंतचे साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तसेच काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव देखील देण्यात येणार आहेत.
नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे साहित्य उपलब्ध झाल्यानंतर विशेष शिबिर आयोजित करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबतच काही साहित्याचे वाटप खासदार निधीतून देखील करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. साहित्य वितरण शिबिराची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून त्याबाबत सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.
दरम्यान, दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक असलेल्या कृत्रिम अवयव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. (युवा क्रांती वृत्तसेवा)








