शेगांव (डी ललित) : मोठा मळा चारमोरी पुलाजवळ शेगांव येथे कुटुंबातील वादातून गंभीर मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी सौ. काजल सुनिल काठोळे (वय 28, व्यवसाय–घरकाम) यांनी दिलेल्या तोंडी अहवालावरून अरुण अवधुत काठोळे व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 08 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 9 वाजता फिर्यादींच्या घराजवळील फोकसबाबत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या मारहाणीत झाले. फिर्यादींच्या मते, त्यांचे देवर अरुण अवधुत काठोळे यांनी घराशेजारी लावलेला फोकस अनधिकृतरीत्या काढून नेल्याने त्यांनी त्याला कारण विचारले. यावरून संतापलेल्या अरुणने शिवीगाळ करत फिर्यादींच्या पती सुनिल काठोळे यांना ढकलाढकली केली.
यानंतर अरुणने जवळ पडलेली विट उचलून सुनिल काठोळे यांच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात त्यांचे डोके फुटून रक्तस्त्राव झाला. तरीही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली. फिर्यादी काजल काठोळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ओढाताण करण्यात आली.
दरम्यान, अरुणचे मित्र गणेश गजानन बढे, गजानन उर्फ पांडु बढे आणि ज्ञानेश्वर उर्फ गोलु बढे हे घटनास्थळी आले व त्यांनीही सुनिल काठोळे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीने अहवालात नमूद केले आहे.
या गंभीर प्रकारानंतर फिर्यादीने थेट शेगांव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली. दाखल अधिकारी एनपीसी निलेश गाडगे यांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास हवालदार सुनील सुसर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील कारवाईबाबत स्थानिकांचे लक्ष शेगाव पोलिसांकडे लागले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)













