---Advertisement---

शेगांव रेल्वे स्थानकावर चार एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची जोरदार मागणी!

शेगाव प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन
---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या संत नगरी शेगांव रेल्वे स्थानकावर अधिकाधिक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच प्रवासी सुविधांचा विस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी शेगांव प्रवासी संघटना व शेगांव संघर्ष समिती यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

शेगांव हे श्री संत गजानन महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून देशभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. शेगांव रेल्वे स्थानकास NSG-3 दर्जा प्राप्त असून दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपयांचे रेल्वे उत्पन्न येथे मिळते. तसेच शेगांव स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन योजना’ मध्ये समावेश असतानाही अनेक महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा देण्यात आलेला नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, शेगांव रेल्वे स्थानक हे भारतातील प्रसिद्ध लोणार (साल्टेड) क्रेटर लेक जवळील महत्त्वाचे स्थानक असून पर्यटनाच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व मोठे आहे. भुसावळ मंडळाअंतर्गत असतानाही येथे प्रवासी सुविधांची कमतरता असून अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा नसल्याने भाविक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या चार महत्त्वाच्या गाड्यांना शेगावात थांबा देण्याची मागणी

संघटनेच्या वतीने खालील गाड्यांना शेगांव रेल्वे स्थानकावर तातडीने थांबा देण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे—

  1. 22109/22110 – बल्हारशाह–मुंबई एक्सप्रेस
  2. 20625/20626 – चेन्नई–भगत की कोठी (जोधपूर) एक्सप्रेस
  3. 19021/19022 – उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस
  4. 17605/17606 – काचिगुडा–भगत की कोठी (जोधपूर) एक्सप्रेस

या गाड्यांना प्रवाशांमध्ये मोठी मागणी असतानाही शेगांव येथे थांबा मंजूर न होणे आश्चर्यकारक असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

प्रवासी सुविधा व मालवाहतूक टर्मिनलचीही मागणी

निवेदनात प्रतीक्षालय, स्वच्छता व्यवस्था, दिशादर्शक फलक, मूलभूत सोयीसुविधांचा विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रेल्वे जमीन उपलब्ध असल्याने शेगांव येथे मालवाहतूक टर्मिनल (गुड्स शेड) विकसित करावे, ज्यामुळे स्थानिक व्यापार व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, अशीही मागणी करण्यात आली आहे.

निवेदन सादरीकरण व पुढील कार्यवाही

हे निवेदन प्रथम शेगांव रेल्वे स्टेशन मास्टर यांना सादर करण्यात आले असून त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव, केंद्रीय आयुष मंत्री मा. प्रतापरावजी जाधव, राज्य मंत्री मा. आकाशदादा फुंडकर, आमदार मा. संजू भाऊ कुटे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM) तसेच भुसावळ मंडल रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.

या निवेदनावर ॲड. पी. आर. डांगरा, वरुण नागपाल, मयूर मुहाना, पत्रकार संजय त्रिवेदी, अंकुश चांडक, विजय राठी, सोमेश कांबळे, प्रफुल मुहाना, राहुल अग्रवाल, दिनेश बनोले व ॲड. दीप्ती पाटील यांच्या सह्या असून रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment