---Advertisement---

शेगांव समस्या, गोपाल तायडे यांचे नगराध्यक्षांना स्मरणपत्र, मागण्या न पूर्ण झाल्यास आंदोलनाचा इशारा.

---Advertisement---

शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा): संत नगरी शेगांव शहरातील नागरी सुविधांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध भागात स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, प्रकाश व्यवस्था आदी मूलभूत सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गोपाल तायडे यांनी नगराध्यक्षांना स्मरणपत्र देत शहरातील प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.

नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणात अमरावती विभागातून नामांकन मिळून चांगले गुण प्राप्त झाले असले तरी प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचत नसल्याने प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्मरणपत्रातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे

  • रेल्वे स्टेशन ते मंदिर मार्गासह शहरातील प्रमुख ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह व मुतारीची व्यवस्था करावी.
  • शहरातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करून नाल्यांची नियमित साफसफाई करावी.
  • खड्डेमुक्त रस्त्यांसाठी तातडीने दुरुस्ती करावी.
  • नागरिकांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी.
  • महापुरुषांच्या चौकांची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता व विद्युत रोषणाईची व्यवस्था करावी.
  • सांडपाणी व्यवस्थेसाठी खोदलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
  • भटक्या जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.
  • मातंगपुरी व मंदिर परिसरातील लघु दुकानदारांना कायमस्वरूपी जागा व शॉप अ‍ॅक्ट परवाना द्यावा.
  • शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे बदलून नवीन कॅमेरे बसवावेत.
  • पथदिवे सुरळीत करून शहरात प्रकाश व्यवस्था सुधारावी.
  • साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे चौकाचे सौंदर्यीकरण तातडीने पूर्ण करावे.
  • पुनर्वसित कुटुंबांना 7/12 व 8/अ कागदपत्रे देऊन मालकी हक्क प्रदान करावा.
  • बेघर व गरजू कुटुंबांना प्रलंबित सदनिका तातडीने वाटप करावे.
  • म्हाडा कॉलनीतील सांडपाणी व चेंबर समस्येचे तातडीने निराकरण करावे.

प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

गोपाल तायडे यांनी यापूर्वीही नगरपरिषदेला निवेदन दिले होते. मात्र अनेक महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शहरातील वाढत्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment