शेगांव (डी ललित): शहरातील काशीलानी पेट्रोल पंपासमोर एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रिन्स रमेश वाजगे (वय 19) हे श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, शेगाव येथे शिक्षण घेत असून ते स्वामी विवेकानंद वसतिगृहात राहतात. 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ते आपल्या मित्रांसोबत काशीलानी पेट्रोल पंपासमोर अंड्याच्या गाडीवर उभे असताना ही घटना घडली.
त्यावेळी आरोपी ओम टाले, त्याचे मित्र गौरव हळदे आणि सुमित चव्हाण तेथे आले. ओम टाले याने प्रिन्स वाजगे यांना कॉलेजमध्ये “रिस्पेक्ट देत नाहीस आणि सर म्हणत नाहीस” असा आरोप करत वाद घातला. त्यानंतर त्याने प्रिन्स वाजगे यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
मारहाण थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या अभिराज अरविंद कदम आणि यश लखन मलीये यांनाही आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली व “मध्ये पडल्यास तुम्हालाही ठार मारू” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपी ओम टाले, गौरव हळदे व सुमित चव्हाण यांच्याविरुद्ध अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोहेका निलेश गाडगे करीत आहेत.(युवा क्रांती वृत्तसेवा)








