शेगांव (डी ललित): शेगांव शहरातील वरवट रोड परिसरात भरधाव व निष्काळजी वाहनचालनामुळे गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यादव बेकरी जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला तवेरा वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून आरोपी चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अपघाताचा तपशील
दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ ते १० दरम्यान ही घटना घडली. तवेरा गाडी क्रमांक MH 28 C 4331 चा चालक अतिवेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. यादरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला पंक्चर काढण्यासाठी उभी असलेली मारुती स्वीफ्ट डिझायर (MH 15 JW 9258) या कारला तवेरा गाडीने मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत कार मागे उभे असलेले विशाल राजेश बरमण (रा. महाराणा प्रताप चौक, महाल्ले फार्म, लक्ष्मी नगर, नाशिक) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या दोन्ही पायांना तसेच उजव्या हाताच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी व आर्थिक नुकसान
अपघातात स्वीफ्ट डिझायर कारच्या डिक्कीचे काच फुटून डिक्की पूर्णपणे वाकडी झाली असून अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर आरोपी चालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
पोलीस कारवाई
या प्रकरणी जखमीची पत्नी सौ. राधा विशाल बरमण (वय २९, व्यवसाय – घरकाम) यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून कलम २८१, १२५(A), ३२४(४) सह कलम १३४ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास घटटे हे करीत आहेत.










