---Advertisement---

गोवंश कातडी वाहतूक प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

सोनाळा पोलिसांनी जप्त केलेली गोवंश कातडी
---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु. बसस्थानक परिसरात सोनाळा पोलिसांनी अवैध गोवंश कातडी वाहतुकीवर मोठी कारवाई केली. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १०.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत कत्तल केलेल्या आठ गोवंश प्राण्यांची कातडी जप्त करण्यात आली असून, एका अनोळखी गोवंश तस्करासह दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, एका ऑटोरिक्षामधून अवैधरित्या कत्तल केलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची कातडी वाहतूक होत असल्याचे सोनाळा पोलिसांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून संशयित तीनचाकी ऑटोरिक्षा अडवली.

ऑटोरिक्षाची तपासणी केली असता, प्लॅस्टिक पोत्यांमध्ये गोवंश जातीच्या ८ जनावरांची कातडी आढळून आली. यातील काही नमुने वैद्यकीय अधिकारी, सोनाळा यांनी रासायनिक परीक्षणासाठी राखून ठेवले आहेत.

कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गोवंश कातडीची अंदाजे किंमत ८ हजार रुपये असून, वापरते ऑटोरिक्षा क्रमांक MH 49 E 2819 ची अंदाजे किंमत ५० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल आरोपी :

या प्रकरणी शेख शरीफ शेख इस्माईल (वय ३०), शेख भोरू शेख तस्लीम (दोन्ही रा. जळगांव जामोद) तसेच एक अनोळखी इसम (रा. बावनबीर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली व पशुसंवर्धन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कॉन्स्टेबल राहुल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल शाकीर पटेल करीत आहेत.
या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल, कातडी वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment