निवाणा (आकाश बोरसे )– कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद यांच्या वतीने समूह प्रथम रेषीय प्रात्यक्षिकांतर्गत “सोयाबीन पिकांचे एकात्मिक पीक व्यवस्थापन” या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम निवाणा येथे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद ग्रामपंचायत चांगेफळचे उपसरपंच निखिल जाधव यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संजय उमाळे (कृषीविद्या) व अनिल गाभणे (पीक संरक्षण) उपस्थित होते.

संजय उमाळे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, अंतर मशागत, तण नियंत्रण, विद्राव्य खतांचा वापर व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. अनिल गाभणे यांनी सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन, किडीचे सर्वेक्षण, किडीचा जीवनक्रम तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी व हुमणी अळी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमांतर्गत गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी आवश्यक निविष्ठांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तंत्रज्ञान सहाय्यक कृष्णा खिरोडकर यांनी केले. या प्रसंगी विठ्ठल काका मसूरकार, मदनशेठ झवर, गजानन रोजतका, भास्कर उमरकर, अशोक दाते, महादेव टेकाडे, समाधान सोनवणे, पांडूभाऊ उमरकर, भिकाजी उमरकर, संतोष वसतकार, विष्णू सरदार, संतोष दाते, संजीव पवार, गणेश तारापुरे, स्वप्निल बोरसे, भारत मसूरकार, संतोष तारापुरे, सचिन मोहे, वसंता आकोटकार, जानराव उमरकर, रमेश उमरकर, विनायक सरदार, सुभाष उमरकर, अमोल जाधव, गोपाल जाधव, विठ्ठल उमरकर यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होत. (युवा क्रांती वृतसेवा)
