---Advertisement---

स्वच्छतेची जबाबदारी नगरपरिषदेची…पण स्वतःचं स्वच्छतागृह मात्र कुलूपबंद!

---Advertisement---

सार्वजनिक स्वच्छतागृह बंद! स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह?

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा): संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगांव शहराची स्वच्छतेची जबाबदारी जरी नगरपरिषदेवर असली तरी स्वतःचेच सार्वजनिक स्वच्छतागृह अनेक महिन्यांपासून कुलूपबंद असल्याचे समोर आले आहे. परिणामी नागरिकांबरोबरच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शहरात स्वच्छतेसाठी विविध मोहिमा राबवल्या जात असून “स्वच्छ भारत अभियान” सारख्या उपक्रमांचा गाजावाजा सातत्याने होत असतानाही मूलभूत सुविधा मात्र दुर्लक्षित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंद अवस्थेतील स्वच्छतागृहामुळे नागरिकांना सुविधा मिळवण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. विशेषतः महिलांसह वृद्ध आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“स्वच्छतागृह नाही तर स्वच्छ भारत कसा?”

संत नगरी शेगांवची स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तीच नगरपरिषद गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःचे सार्वजनिक स्वच्छतागृहच चालू करू शकलेली नाही!

नागरिक, आणि स्वतःचेच कर्मचारी यांना यातून प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे गाजावाजा करीत असतानाच मूलभूत सुविधा ठप्प? असे चित्र नेमके कोणाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाले असा
जनतेच्या मनात एकच सवाल निर्माण होतो.

-प्रविण मोरखडे

नागरिक महिलांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून “सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने रोजच्या गरजांसाठी त्रास सहन करावा लागतो,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. वृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांनाही पर्यायी व्यवस्था शोधावी लागत असल्याचे समोर आले आहे. काही वेळा अस्वच्छ ठिकाणी जावे लागल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहराच्या स्वच्छतेसाठी योजनांवर लाखो रुपयांचा खर्च होत असताना नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने संतापाची लाट पसरली आहे. “फक्त योजना जाहीर करून उपयोग नाही, त्या प्रत्यक्षात राबविल्या गेल्या पाहिजेत,” अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

नगरपरिषदेने तातडीने दुरुस्ती व देखभाल करून सार्वजनिक स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा प्रशासनाविरुद्ध जनतेचा रोष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी मिळालेली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment