---Advertisement---

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत बोंडगांव शाळेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न!

---Advertisement---

बोंडगांव(सचिन कडूकार): जि.प.शाळा बोंडगांव येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी शनिवार दप्तराविना शाळा या उपक्रमांतर्गत आकर्षक व रंगतदार वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित करणारे उपक्रमशील शिक्षक श्री. डिगांबर काकड व स.अ.सौ. वर्षा काकड यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा यशस्वी पार पडली.

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. शिक्षक, माता जिजाऊ, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वप्नातील परी, ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या सामाजिक संदेश देणाऱ्या संकल्पना, तसेच मुक्ताई यांसारख्या विविध वेशभूषांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मुलांनी आपापल्या वेशभूषांना अनुरूप असे स्वसंवाद सादर करताना प्रात्यक्षिकातून देशभक्ती, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जाण यांचा प्रभावी संदेश मांडला.

या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना स.अ.सौ. वर्षा काकड यांच्या हस्ते लेखन साहित्य भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सहकार्य कौशल्य विकसित करण्याचा उद्देश या उपक्रमातून साधला गेल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शा.व्य.स. अध्यक्ष श्री. प्रविण इलामे, तसेच सर्व सदस्यांसह सौ. कल्पनाताई थारकर, सौ. वंदनाताई इलामे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बोंडगांव जि.प.शाळेतील हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श नमुना ठरला.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment