(युवा क्रांती वृत्तसेवा) : वाराणसी येथे बुधवारी सकाळी विमानतळावरील संगणकीय प्रणाली अचानक ठप्प पडल्याने देशभरातील विमान वाहतुकीत मोठी विस्कळीतता निर्माण झाली. वाराणसीनंतर मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख विमानतळांवरील प्रणालीही मंदावल्याने चेक-इन प्रक्रिया कोलमडली आणि विमान कंपन्यांच्या सेवांमध्ये प्रचंड विलंब झाला.
यामुळे दिवसभरात सुमारे २०० पेक्षा अधिक विमाने रद्द करावी लागली, तर अनेक विमानांना ३ ते ८ तासांचा विलंब सहन करावा लागला. संगणक प्रणाली बंद पडल्याने अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन हाताने बोर्डिंग पास जारी करण्याचा मार्ग अवलंबला. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे विमानतळांवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
प्रवाशांना विलंबाचे नेमके कारण विमान कंपन्यांनी वेळेवर न सांगितल्याचा आरोप अनेक प्रवाशांनी केला. त्यातून प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले.
हैदराबाद येथेही उड्डाणे ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांचे महत्त्वाचे प्रवास कार्यक्रम अस्ताव्यस्त झाले. हैदराबादहून मध्यरात्री १२ वाजता मुंबईकडे निघणाऱ्या विमानाने प्रवास करणार होत्या त्या मेघा लाडोळे यांना तब्बल ८ तासांच्या विलंबाचा सामना करावा लागला. सकाळी ८ वाजता उड्डाण सुरू झाल्याने त्यांचे अमेरिकेचे कनेक्टिंग फ्लाइट चुकले. अखेरीस विमान कंपनीने गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांच्या प्रवासाची सोय करून दिली.
विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनांनी तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, प्रणाली पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांना पर्यायी सुविधा व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही विमान कंपन्यांनी दिले आहे.












