शेगांव (चेतना खेते): शेगांव शहरात येत्या २८ व २९ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘विश्व मांगल्य मातृ संस्कार समागम’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. मातृशक्तीच्या सक्षमीकरणासाठी व संस्कारमूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या भव्य समागमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या तयारीसाठी शहर कार्यकारिणीची दमदार घोषणा करण्यात आली आहे.
या समागमाच्या अध्यक्षपदी अंजलीताई जोशी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मार्गदर्शन सत्रे, संस्कारवर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रेरणादायी व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये सामाजिक जागरूकता वाढवणे, संस्कारमूल्यांची जपणूक करणे आणि कुटुंबव्यवस्थेला बळकट करणे हा मुख्य उद्देश आहे. समागमात विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.
समागमासाठी शहरातील अनेक महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्या व स्वयंसेविका सक्रियपणे कार्यरत असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. आयोजकांनी शेगांव शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समागमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)








