अकोला (युवा क्रांती वृतसेवा) : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेत समाविष्ट असलेल्या या आरोग्य केंद्राला ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ म्हणून मान्यता देण्यात आली असताना येथेच अवैध गर्भपात होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हा आरोप खुद्द सरकारमधील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी केला असून त्यांनी स्वतः या आरोग्य केंद्राचे स्टिंग ऑपरेशन केले. पाहणीदरम्यान रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना मासाचे गोळे आढळल्याचा दावा आमदार मिटकरी यांनी केला. त्यामुळे या केंद्रात अवैध गर्भपाताच्या घटना घडत असल्याचे गंभीर संकेत मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिवरखेड हे ४० हजार लोकसंख्येचे महत्त्वाचे गाव असून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे ३५ आदिवासी खेड्यांसह अनेक गावांचे आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र आहे. मात्र इतक्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा नसल्याचे आमदार मिटकरी यांच्या पाहणीत उघड झाले. कर्मचारी वेळेवर अनुपस्थित राहणे, रुग्णालय परिसरात प्रचंड घाण पसरणे यासारख्या गंभीर त्रुटीही त्यांच्या निदर्शनास आल्या.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार मिटकरी यांनी सरकार आणि प्रशासनाकडे केली आहे. तसेच यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या गंभीर आरोपांवर सरकार आणि प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










