जळगांव जामोदचा जागतिक पातळीवर गौरव!
जळगांव जा. (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोदचे पावरलिफ्टर कैलास धुळे आणि निधी धुळे यांनी श्रीलंका येथे २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान झालेल्या जागतिक पावरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ऑस्ट्रेलिया, नेपाळ, रशिया, पाकिस्तानसह अनेक राष्ट्रांतील अव्वल खेळाडूंवर मात करत कैलास धुळे यांनी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली, तर निधी धुळे यांनी तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक आपल्या झोळीत घालत जळगाव जामोदचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले.
कठोर परिश्रम, शिस्त, प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाच्या जोरावर या दाम्पत्याने आपली गुणवत्ता जागतिक पातळीवर सिद्ध केली आहे. त्यांच्या ऐतिहासिक यशामुळे तालुका व जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज आमदार डॉ. संजय कुटे यांनी विशेष सत्कार समारंभात कैलास धुळे आणि निधी धुळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “या दाम्पत्याने केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जामोदचा मान उंचावला आहे. भविष्यात आणखी मोठ्या मंचावर भारताचा तिरंगा फडकवावा,” अशा शुभेच्छा आमदार कुटे यांनी यावेळी दिल्या.
जळगांव जामोदच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी ही कामगिरी असून कैलास व निधी धुळे दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












