जळगांव जा. (आकाश बोरसे): जिवंत असलेल्या वृद्ध आईचा मृत्यू झाल्याचे बनावट स्वयंघोषणापत्र तयार करून नगरपरिषदेकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवत तिच्या बँक खात्यातील दहा लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट रक्कम लंपास केल्याची अत्यंत धक्कादायक घटना जळगांव जामोद शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे 75 वर्षीय वृद्ध महिलेला अक्षरशः भीक मागून जगण्याची वेळ आली असून संपूर्ण प्रकरणाने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई कौशल्याबाई राजपूत यांचा मृत्यू 5 ऑक्टोबर 2023 रोजी झाला असल्याचे खोटे स्वयंघोषणापत्र तयार केले. हे बनावट घोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगांव जामोद नगर परिषद कार्यालयात सादर करून, कोणतीही शहानिशा न करता नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी जिवंत वृद्धेच्या नावावर मृत्यूची नोंद केली आणि मृत्यू प्रमाणपत्रही दिले.
या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे प्रेमसिंह राजपूत याने आपल्या आईच्या बँक खात्यातील दहा लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट रक्कम काढून पसार झाला. उतार वयात आपल्या उर्वरित आयुष्यासाठी घर विकून बँकेत ठेवलेली ही रक्कम अचानक गायब झाल्याने कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली.
जिवंतपणी स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागण्याची वेळ
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर 75 वर्षीय कौशल्याबाई यांनी धक्क्यातून सावरत नगरपरिषदेत स्वतःच्या नावाने अर्ज करून ‘मी जिवंत आहे’ याचा पुरावा देत स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागण्याची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच बँकेत चौकशी केल्यानंतर दहा लाख रुपये मुलाने काढून पसार झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या कौशल्याबाई एकट्याच एकाकी जीवन जगत असून, आपली ओळख जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यांनी 9 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुन्हा दाखल; आरोपी फरार
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगांव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी उशिरा का होईना, बनावट स्वयंघोषणापत्राद्वारे नगरपरिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक 605/2025, भारतीय दंड संहिता कलम 420, 468, 471 अंतर्गत आरोपी प्रेमसिंह कमलसिंह राजपूत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
दरम्यान, जिवंत वृद्धेच्या नावावरील मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे वृद्ध कौशल्याबाईंच्या आयुष्याचे झालेले हाल आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)













