बुलढाणा | (आकाश बोरसे): बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर मोठा बदल झाला असून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची निवड पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या आयुक्त पदावर झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. प्रवीण कुमार देवरे हे लवकरच नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
डॉ. किरण पाटील यांच्या बदलीनंतर आज बुलढाणा जिल्हा महसूल विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी व अधिकारी वर्गाने त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व अधिकाऱ्यांमध्ये दिलखुलास संवाद झाला तसेच प्रशासनातील विविध अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली.
प्रशासनात नेहमी कार्यमग्न राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणून डॉ. किरण पाटील यांची ओळख आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असो की शासकीय निवासस्थान — त्यांनी नेहमीच सकारात्मक वातावरण निर्माण करत सर्वांना सहकार्य केले.
या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. पुणे येथे नव्या जबाबदारीची धुरा स्वीकारताना ते पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागातही प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या रूपाने जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळणार असून प्रशासनात नव्या धोरणांना व कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








