बुलढाणा | (डी ललित): दि. 3-राज्यातील महसूल प्रशासनाचा वाढता कामाचा व्याप आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करून महसूल व वन विभागाने २ एप्रिल २०२६ रोजी सुधारित आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा मोठा फायदा बुलढाणा जिल्ह्याला होणार असून जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह तीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत.
या अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, मेहकर तालुक्यातील डोनगाव आणि खामगाव तालुक्यातील लखनवाडा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये (लहान गट) कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
राज्यातील महसूल विभागातील मंजूर पदांचा सर्वंकष आढावा घेत एकूण ३४,५७६ नियमित पदे आणि १,३०० बाह्यस्त्रोतामार्फत भरली जाणारी पदे निश्चित करण्यात आली आहेत. बुलढाणा जिल्ह्याचा समावेश ‘मोठ्या जिल्ह्यां’मध्ये करण्यात आला असून येथे १५१ नियमित आणि ११ बाह्यस्त्रोत पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १३ नियमित पदे मंजूर करण्यात आली असून प्रत्येक नवीन अपर तहसीलदार कार्यालयासाठी ७ नियमित पदांची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करताना लोकसंख्या, तालुक्यांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच ‘मंडळ’ हा घटक महत्त्वाचा मानून कोणत्याही एका मंडळाचे विभाजन दोन कार्यालयांत होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
या सुधारित रचनेमुळे महसूल प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः जमिनीचे दाखले, महसुली प्रकरणे आणि विविध शासकीय सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने प्रशासन अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)







