शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील प्रबुद्ध कॉलनी येथे मुलांच्या किरकोळ वादातून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी शेगांव शहर पोलीस ठाण्यात जातीय एनसी दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोशन अरुण उमाळे (वय 32, रा. प्रबुद्ध कॉलनी, शेगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 3.30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर ही घटना घडली.
तक्रारीनुसार, तक्रारदार व गैरअर्जदार शेख अत्तर शेख शकूर (रा. प्रबुद्ध कॉलनी, शेगांव) हे एकाच परिसरात राहतात. त्यांच्या मुलांमध्ये खेळताना झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला. वादाच्या पार्श्वभूमीवर गैरअर्जदाराने तक्रारदार यांना लोटपाट करून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी कलम 115(2), 352, 351(2) BNS नुसार नोंद केली आहे.
सदर प्रकरणाची नोंद मपोहेका संगीता म्हसाळ यांनी केली असून पुढील तपास पोहेका सुनील सुसर करीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई सुरू आहे.








