शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : ८ जून –शेगाव-खामगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ कांदा विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याला दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना ७ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख रुस्तम शेख गफूर (वय ३३, रा. जवळा बुद्रुक) हे शेगाव-खामगाव रोडवर कांदा विक्री करत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याकडील Oppo K12 कंपनीचा मोबाईल फोन (किंमत ८ हजार रुपये) तसेच गल्ल्यातील ७ हजार रुपये रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे करीत आहेत.








