बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : २० जुलै – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांना सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १० सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, उद्योजकता, संगणक क्षेत्र तसेच पूर, आग, अपघात, दरोडा किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये धाडसी कार्य करून देश व राज्याची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी किंवा पाल्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीसाठी ₹२५ हजार, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी ₹५० हजार विशेष गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
याशिवाय, इयत्ता १० वीमध्ये ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आणि १२ वीमध्ये ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना ₹२० हजारांचा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पात्र माजी सैनिक, त्यांच्या पत्नी व पाल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १० सप्टेंबर २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








