---Advertisement---

Shegaon Crime News: शेगावात पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला; दोन्ही गटातील चौघे जखमी, परस्परविरोधी गुन्हे दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील एमएसईबी (महावितरण) चौक परिसरात रविवारी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान पूर्वीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात दोन्ही बाजूंचे चौघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेत कुऱ्हाड, चाकू तसेच बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला असून, शेगाव शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी दसरा नगर (शेगाव) आणि आळसणा येथील दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटांतील वाद मिटला नसल्याने रविवारी त्याचे हिंसक रूपांतर झाले. या हल्ल्यानंतर संबंधित गुन्ह्यांची नोंद शेगाव शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी युवराज मुकुटराव बेले (वय २४, रा. दसरा नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पवन लांजुळकर व शिवा तांदळे (दोघेही रा. आळसणा) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला तसेच बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अपराध दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात पवन उर्फ बळीराम गजानन लांजुळकर (रा. आळसणा) यांनी दिलेल्या फिर्यादीत मुकुटराव बेले, युवराज बेले, गौरव लांजुळकर आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध कुऱ्हाड व चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अपराध नोंदविण्यात आला आहे.

घटनेत जखमी झालेल्यांना सुरुवातीला सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेनंतर काही काळ शहरात जातीय तणाव निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर आणि परिसरात पसरल्या होत्या. मात्र, शेगाव शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी नागरिकांना अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, ही घटना पूर्ववैमनस्यातून झालेली मारामारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार हे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment