शेगाव | (डी ललित) : लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव यांनी तांत्रिक तपास, सोशल मीडिया विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे नांदुरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय गर्भवती महिलेचा अवघ्या काही दिवसांत शोध घेत तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे लोहमार्ग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै 2026 रोजी संबंधित महिला तिच्या सासऱ्यांसोबत अमरावती–सुरत एक्सप्रेसने प्रवास करत असताना नांदुरा रेल्वे स्थानकावर त्यांच्या नजरेआड होऊन रेल्वेतून उतरली. त्यानंतर तिचा कोणताही संपर्क होत नसल्याने लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे मनुष्य मिसिंग क्र. 03/2026 दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान महिला प्रथम देऊळगाव मही (जि. बुलढाणा) येथे मैत्रिणीकडे गेल्याचे समोर आले. त्यानंतर ती जालना मार्गे नाशिक येथे गेली. स्वतःचा माग लागू नये म्हणून तिने जुने सिमकार्ड बंद करून नवीन सिमकार्ड घेतले आणि अशोकनगर, सातपूर (नाशिक) येथे भाड्याने राहून एका मॉलमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
महिला गर्भवती असल्याने तिचा तातडीने शोध घेणे आवश्यक होते. पोलीस हवालदार गजानन मेटांगे यांनी मोबाईल CDR, लोकेशन, Instagram आणि इतर सोशल मीडिया खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून महत्त्वाचे धागेदोरे मिळवले. कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहितीच्या आधारे तिचे वास्तव्य नाशिकमधील सातपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर 28 जुलै 2026 रोजी पोलीस हवालदार गजानन मेटांगे आणि पोलीस हवालदार राम मोहेकर यांनी नाशिक येथे जाऊन संबंधित महिलेचा शोध घेत तिला सातपूर पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान तिने कौटुंबिक कारणांमुळे आणि आई-वडील रागावतील या भीतीने घर सोडल्याची कबुली दिली.
यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महिलेची तिच्या आईसोबत भेट घडवून आणण्यात आली. अनेक दिवसांनंतर झालेल्या या भावनिक भेटीत आई-मुलीने एकमेकींना मिठी मारत अश्रूंनी भावना व्यक्त केल्या. त्यानंतर महिलेस तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये आणि प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन मेटांगे, राम मोहेकर आणि किरण आघाव यांनी पार पाडली. (युवा क्रांती वृत्तसेवा )









