बुलढाणा | (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील 9 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हे आदेश 28 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलाची अत्यंत महत्त्वाची शाखा मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) पूर्णवेळ जबाबदारी पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी एलसीबीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्याकडे आता बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदाची धुरा देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक संग्रामसिंग पाटील यांची बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सायबर पोलीस स्टेशनचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
तसेच गजानन कांबळे यांची बदली सायबर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून त्यांच्याकडे कल्याण शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे.
याशिवाय श्रीकांत निचळ यांची तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार, देविदास दादाराव इंगोले यांची पासपोर्ट शाखेत, सचिन बागुल यांची जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार, तर रवि राठोड यांची आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलाच्या विविध शाखांमध्ये कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बदल्यांची यादी
- हेमंत ठाकरे – पूर्णवेळ प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB)
- आशिष रोही – ठाणेदार, बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन
- संग्रामसिंग पाटील – ठाणेदार, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन
- गजानन कांबळे – सायबर पोलीस स्टेशन व अतिरिक्त कार्यभार कल्याण शाखा
- प्रताप भोसले – तात्पुरता प्रभारी, जिल्हा वाहतूक शाखा
- श्रीकांत निचळ – ठाणेदार, तामगाव पोलीस स्टेशन
- देविदास इंगोले – पासपोर्ट शाखा
- सचिन बागुल – ठाणेदार, जळगाव जामोद पोलीस स्टेशन
- रवि राठोड – आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा व अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) (युवा क्रांती वृत्तसेवा)









