शेगाव, (युवा क्रांती वृत्तसेवा) : महिला पतंजली योग समिती, तहसील शेगावच्या वतीने 29 जुलै 2026 रोजी लावण्या योगा हॉल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. योगगुरू स्वामी रामदेव बाबा, आचार्य बालकृष्णजी, वंदनीय गुरुमाता तसेच राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरू गजानन महाराज आणि स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर प्रीती घाटोड, तृप्ती सेजपाल आणि जयश्री धोपटे यांनी होम-हवन विधी केला.
आरती हिवराळे, स्वाती पवार आणि प्रीती शर्मा यांनी सुरेल गुरुवंदना सादर केली. तर योगसाधिका प्रणिता कर्ये, पल्लवी ठाकरे व त्यांच्या समूहाने आकर्षक योगनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे रश्मी संघानी यांनी स्वामी रामदेव बाबा यांची वेशभूषा साकारत विविध योगासनांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना स्वामीजी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव आला.
तहसील प्रभारी व योगशिक्षिका कालिंदी असंबे यांनी महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि गुरूंचे जीवनातील स्थान यावर मार्गदर्शन केले. स्वामी रामदेव बाबा यांच्या योगप्रसारामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सुमारे 60 योगसाधिका सहभागी झाल्या. सर्व सहभागी महिलांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻









