शेगाव | (प्रशांत पवार) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती आणि दैनिक लोक युवा वर्धापन दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 सन्मान सोहळा शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वाध्याय कक्ष सभागृहात उत्साहात पार पडला.
राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त 628 प्रस्तावांमधून निवड करण्यात आलेल्या 125 मान्यवरांना राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी विजय कुळकर्णी, भाजप शहराध्यक्ष चंद्रकांत घोराडे आणि उद्योजक बाळासाहेब दामोदर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, विधी, उद्योग, अभिनय आदी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रकाश थाटे, सुधाकर तायडे, अमोल वानखेडे, मयूर लड्डा आणि देवेंद्र जयस्वाल यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल केसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
विशेष आकर्षण
कार्यक्रमात देशसेवेसाठी योगदान देणारे माजी सैनिक, वारकरी, आदर्श शिक्षक, गो ग्रीन फाउंडेशनचे कार्यकर्ते, संत निरंकारी मिशनचे प्रतिनिधी, कवी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार यांचाही सन्मानचिन्ह आणि बॅग देऊन गौरव करण्यात आला. (युवा क्रांती वृत्तसेवा)









