जलंब | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 4 ऑगस्ट- ग्रामपंचायत जलंब अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौकातील नालीची साफसफाई तसेच खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नालीचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तसेच नागरिकांची दैनंदिन ये-जा विस्कळीत झाली असून, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मनसेने निवेदनाद्वारे नालीची तातडीने साफसफाई करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. समस्या तातडीने सोडवली नाही तर **”मनसे स्टाईल”**ने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख आणि तालुकाध्यक्ष नितीश भावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी शाखाध्यक्ष सम्यक महिंद्र शिरसाठ, शाखा उपाध्यक्ष रोहित सिंग राजपूत, शाखा सचिव संकेत धामणकार, प्रसिद्धी प्रमुख निखिल वाघमारे, सदस्य ऋषिकेश शिरसाट, यश सावळे तसेच कोषाध्यक्ष श्रीकांत गव्हान्दे उपस्थित होते.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा मनसे आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन करेल,” असा स्पष्ट इशारा दिला.









