शेगाव, (प्रशांत पवार) : दि. 5 ऑगस्ट-शेगाव शहरातील खामगाव रोडवरील महावितरण कार्यालयालगत असलेल्या प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील वै. पुरुषोत्तम हरी पाटील नगर परिसरात मागील सहा महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी महावितरण कार्यालयावर लोकशाही मार्गाने जनआंदोलन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या संदर्भात नागरिकांच्या वतीने 4 ऑगस्ट 2026 रोजी उपकार्यकारी अभियंता पंकज मिश्रा यांच्या मार्फत सहाय्यक अभियंता (शहर) नितीन टिकार यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला. यापूर्वीही 26 मे 2025 रोजी याच समस्येबाबत महावितरणकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वै. पुरुषोत्तम हरी पाटील नगरातील श्रीराम स्टील सेंटरजवळील गल्लीसह परिसरात दिवस-रात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य रहिवाशांना मोठ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण परिसरातील विद्युत तारा, डीपी व इतर यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी शेगाव शहर महावितरण कार्यालयावर संपूर्ण नगरातील नागरिकांचा जनआंदोलन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या अर्जावर विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून त्याच्या प्रती कार्यकारी अभियंता, महावितरण खामगाव, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन शेगाव तसेच जिल्ह्यातील संपादक व पत्रकार यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. (युवा क्रांती वृत्तसेव)









