संग्रामपूर |(आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील रहिवासी, कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूरचे विद्यमान संचालक तथा पळशी झाशीचे माजी सरपंच अभयसिंह मनोहर मारोडे यांची इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी (ISD) आयोजित ‘द गुड पॉलिटिशियन २०२६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
देशभरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात तळागाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हजारो अर्जदारांमधून निवडलेल्या अवघ्या ५० युवा नेत्यांमध्ये अभयसिंह मारोडे यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी संपूर्ण विदर्भातून निवड होणारे ते एकमेव युवा नेतृत्व ठरले आहेत.
तीन महिन्यांच्या निवड प्रक्रियेनंतर अंतिम ५० मध्ये स्थान
या निवड प्रक्रियेला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला. ऑनलाइन लेख सादरीकरण, व्हिडिओ मुलाखत तसेच दोन दिवसीय निवासी बूट कॅम्प अशा विविध टप्प्यांतून उमेदवारांची निवड करण्यात आली. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर अंतिम ५० युवा नेत्यांची निवड करण्यात आली.
नऊ महिन्यांच्या नेतृत्व विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण
या नऊ महिन्यांच्या निवासी नेतृत्व विकास कार्यक्रमात सहभागी युवा नेत्यांना लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये, सार्वजनिक धोरणे, निवडणूक प्रक्रिया, प्रभावी नेतृत्व, जनसंवाद, संघटन उभारणी, निवडणूक नियोजन आणि धोरणनिर्मिती यांसह लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच देशातील विविध राज्यांमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा नेतृत्वाशी संवाद साधण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधीही या कार्यक्रमातून मिळणार आहे.
सामाजिक कार्याची दखल
अभयसिंह मारोडे हे यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे माजी प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते असून, मानवता, समता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे संघटन, शिक्षण तसेच वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य करत असल्याचे सांगण्यात आले.
त्यांच्या सामाजिक व लोकशाहीवादी कार्याची दखल घेत इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसीने त्यांची या राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी निवड केली आहे.
अभयसिंह मारोडे यांची ही निवड संग्रामपूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








