शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. स्वातीताई प्रवीणराव कात्रे (पुंडे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
सौ. स्वातीताई कात्रे या भोनगाव येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांची जाण तसेच सहकार क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. स्वातीताई कात्रे यांनी शिक्षक सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत पतसंस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि सभासदाभिमुख करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. तसेच सभासदांच्या गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीबद्दल शिक्षक सहकाऱ्यांसह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









