सोनाळा : (आकाश बोरसे) : दैनिक देशोन्नतीचे सोनाळा विशेष प्रतिनिधी किशोर हरिदास खडे (वय ५५) यांचे बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी दुचाकी अपघातात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सोनाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
किशोर खडे हे पत्नीसमवेत अकोटहून दुचाकीने सोनाळ्याकडे परतत होते. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील हिवरखेडजवळ कारला फाट्याच्या परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात किशोर खडे व त्यांच्या पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर दोघांनाही प्रथम हिवरखेड, ता. तेल्हारा येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथील मेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना किशोर खडे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नीवर अद्याप उपचार सुरू आहेत.
किशोर खडे यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी आणि एक मुलगा असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात एक कर्तव्यदक्ष आणि परिचित प्रतिनिधी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
आज, गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता वानखेड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








