लेखी परीक्षा, फिटनेस टेस्ट आणि सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मिळवले यश!
शेगाव : (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव क्रिकेट अकॅडमीचा प्रतिभावान पंच पियुष रघुवंशी यांची विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA)च्या प्रतिष्ठित ‘स्टेट पॅनल पंच’ (State Panel Umpire) म्हणून अधिकृत निवड झाली आहे. या निवडीमुळे शेगावच्या क्रिकेट क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कठीण लेखी परीक्षा, मैदानी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (Fitness Test) तसेच प्रत्यक्ष सामन्यांमधील कामगिरीचे मूल्यांकन या सर्व टप्प्यांमध्ये पियुष रघुवंशी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
विशेष म्हणजे, VCAच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पंच आणि BCCIचे अधिकृत परीक्षक विनीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पियुष यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. क्रिकेटच्या नियमांचे सखोल ज्ञान, अचूक निर्णयक्षमता आणि मैदानावर शांतपणे कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमता या गुणांमुळे त्यांनी स्थानिक व विभागीय क्रिकेट स्पर्धांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जिल्हा क्रिकेट प्रशासनाकडून अभिनंदन
पियुष रघुवंशी यांच्या निवडीबद्दल बुलढाणा जिल्हा क्रिकेट कमिटीचे संयोजक किशोर वाकोडे यांनी आनंद व्यक्त केला.
“पियुष रघुवंशी यांची VCA स्टेट पॅनलवर झालेली निवड ही संपूर्ण जिल्हा क्रिकेट प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे. विनीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा पियुषला निश्चितच मोठा फायदा झाला आहे. ग्रामीण भागातूनही योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर उच्च दर्जाचे मॅच ऑफिशियल्स तयार होऊ शकतात, हे पियुषने सिद्ध करून दाखवले आहे.”
शेगाव क्रिकेट अकॅडमीकडून कौतुक
शेगाव क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक राम ढोरे यांनीही पियुषच्या यशाचे कौतुक केले.
“आज अकॅडमीतील आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. पियुषने क्रिकेटबद्दलची आवड आणि निष्ठेचे रूपांतर उत्कृष्ट पंच कौशल्यात केले आहे. त्याची शांत वृत्ती, नियमांचे ज्ञान आणि निर्णयक्षमता VCAच्या आगामी वाटचालीत निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. त्याचे हे यश शेगावमधील इतर तरुण क्रिकेटपटू आणि भावी पंचांसाठी प्रेरणादायी आहे.”
या यशाबद्दल सहाय्यक प्रशिक्षक सर्वेश शर्मा, तसेच अकॅडमीचे वरिष्ठ मार्गदर्शक मुन्ना साबीर, इम्रान खान आणि चंद्रकांत साळुंके यांनी पियुष रघुवंशी यांचे अभिनंदन केले. खेळाप्रती असलेली त्यांची शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रम हे इतर युवा खेळाडूंसाठी आदर्श असल्याचे त्यांनी म्हटले.
BCCI राष्ट्रीय पॅनलकडे वाटचालीचे महत्त्वाचे पाऊल
VCAच्या स्टेट पॅनलवर निवड झाल्यामुळे पियुष रघुवंशी यांना VCAच्या अंतर्गत आयोजित विविध वरिष्ठ विभागीय, जिल्हास्तरीय, निमंत्रित आणि राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे.
त्यांची ही निवड भविष्यात BCCIच्या राष्ट्रीय स्तरावरील पंच पॅनलकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. पियुषच्या या यशामुळे शेगावसह बुलढाणा जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.









